वेंगुर्ला समुद्रकिनारा

Payal Bhegade
19 Dec 2023
Beach

आंबा, काजू आणि माडांच्या बनांनी वेंगुर्ला हिरवागार दिसतो. महाराष्ट्रातील कमी प्रदूषित समुद्र किनार्‍यांमध्ये वेंगुर्ल्याच्या किनार्‍यांची गणना होते. सागराची निळाई, लाटांची गाज पर्यटकांना मोहवते. सागरेश्वर बीच, निवती बीच, शिरोडा बीच, मोचेमाड बीच, वायंगणी बीच, तेरेखोल बीच येथे पर्यटक निसर्गाच्या सान्निध्यात स्वतःला हरवून जातात .

वेंगुर्ला हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तालुका आहे. तीन बाजूंना अर्धगोलाकार असलेले मोचेमाड, तुळस आणि दाभोळीचे डोंगर आणि पश्चिमेला अरबी समुद्र अशी वेंगुर्ल्याची रचना आहे. वेंगुर्ला हा प्रमुख व्यापारी बंदर म्हणून ओळखला जाई. ६६५ साली डच व्यापार्‍यांनी येथे व्यापारी केंद्राची उभारणी केली. डचांनंतर ब्रिटिशांनी येथे राज्य केले. आता वेंगुर्ला हे बंदर मासेमारी बंदर म्हणून ओळखले जाते. डच वखार, सेंट ल्युकस हॉस्पिटल, क्रॉफर्ड मार्केट आजही इतिहासाचे साक्षीदार म्हणून उभे आहेत. रस्ते, बागा, व्यापारी केंद्रे, कार्यालये, नगरपालिका अशी सुसज्ज वेंगुर्ला नगराची उभारणी ब्रिटिशांनी केली.

गड – किल्ल्यांची भ्रमंती करणार्‍या पर्यटकांना येथील यशवंतगड व तेरेखोल किल्ला खुणावतो. तेरेखोल किल्ला सध्या गोव्यात असला तरी वेंगुर्ल्यातून भेट देता येते. १७ व्या शतकात सावंतवाडी संस्थानचे महाराज खेम सावंत भोसले यांनी हा किल्ला बांधला. नंतर हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. सध्या तेथे हॉटेल सुरु करण्यात आले आहे.आंबा, काजू आणि माडांच्या बनांनी वेंगुर्ला हिरवागार दिसतो. महाराष्ट्रातील कमी प्रदूषित समुद्र किनार्‍यांमध्ये वेंगुर्ल्याच्या किनार्‍यांची गणना होते. सागराची निळाई, लाटांची गाज पर्यटकांना मोहवते.

धार्मिक पर्यटक येथील पुरातन मंदिरांना आवर्जून भेट देतात. रेडीचा गणपती हा खाणीतून मिळालेला अवाढव्य गणपती आहे. गावातील भक्ताला बाप्पाने दृष्टांत दिला व त्यानंतर खाणीत उत्खनन करून ही मूर्ती बाहेर काढली गेली असे सांगितले जाते. आरवलीला वेतोबा मंदिर आहे. वेतोबा हा गावाचा रक्षणकर्ता देव मानला जातो. येथील वेतोबाला चामड्याच्या चपला वाहिल्या जातात. वेतोबा या चपला घालून आरवलीत रात्री फिरतो व गावाचे रक्षण करतो असे मानले जाते. वेतोबाने वापरून झिजलेल्या चपला येथील काचेच्या कपाटांमध्ये पाहावयास मिळतात.

कनयाळे रेडी येथील नवदुर्गा मंदिर, सातेरी मंदिर, रेडी आणि शिरोड्याचे माऊली मंदिर, रवळनाथ मंदिर यांनाही भेट देऊ शकतो. सागरेश्वर बीचजवळ असणार्‍या सागरेश्वर मंदिरालाही पर्यटक आवर्जून भेट देतात. बागायतवाडी येथील मानसीश्वराचे मंदिरही प्रसिद्ध आहे. त्रिपुरारी पौर्णिमेची सातेरीची जत्रा आणि रामेश्वराची जत्रा प्रसिद्ध आहेत. दशावतारी नाटके पाहण्याची मजा येथे घेता येते.कवी मंगेश पाडगावकर, लेखक आरती प्रभू, क्रिकेटपटू सुनील गावस्कर, रांगोळीकार गुणवंत मांजरेकर, चित्रकार अरूण दाभोळकर हे सगळे वेंगुर्ल्याचे सुपुत्र होत. पर्यटकांना राहण्यासाठी हॉटेल्स, महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या निवास-न्याहारी व्यवस्था, घरगुती खानावळी वेंगुर्ल्यात उपलब्ध आहेत. कोकण रेल्वेने आल्यास कुडाळ रेल्वे स्थानकात उतरून पुढे रिक्षा किंवा एस. टी. ने वेंगुर्ल्यास जाता येते. वेंगुर्ल्याला जायला बसनेही प्रवास करू शकता. मुंबई, पुणे, गोवा येथून एस.टी. तसेच प्रायव्हेट बसही आहेत. वेंगुर्ला फिरण्यासाठी खाजगी वाहनांची सोयही उपलब्ध आहे.

– तृप्ती संजय परब