हर्णै बंदरात ४०- ५० नॉटिकलवर व्हेलचा आढळ

Payal Bhegade
12 Dec 2023
Blog

हर्णै : मासेमारी करताना हर्णै बंदरात खूप खोलवर समुद्रात व्हेल मासा दिसतो. साधारण ४० ते ५० नॉटिकल मैलाच्या अंतरावर आम्हाला व्हेल मासा दिसतो. तो कोणाला काहीही त्रास देत नाही; परंतु तो दिसला की आम्हीसुद्धा नौका बंद करून तिथेच थांबतो. खूपच अजस्त्र असा हा मासा असतो, असे मच्छीमारांनी सांगितले.

सध्या जोरदार सुरू असलेल्या फास्टर आणि एलईडीसारख्या अवैध मासेमारीमुळे व्हेल माशाच्या जातीलासुद्धा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती येथील मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. येथील हर्णै बंदराचे सागरी परिक्षेत्र हे ''अरेबियन सी हम्पबॅक व्हेल''चे हॉटस्पॉट असल्याची नोंद भारतीय वन्यजीव संस्थानने (डब्ल्यूआयआय) केली आहे.

त्यानंतर स्थानिक मच्छीमारांशी याबाबत चर्चा केली असता येथील मच्छीमारांनी सांगितले की, आपल्या भाषेत त्याला देवमासा असे आम्ही म्हणतो. हा मासा किमान ३० फूट लांब आणि ५ ते ६ रूंदीचा आम्ही बघितला आहे. ज्या ठिकाणी तो येतो तिथे थांबून कारंज्यासारखे पाण्याचे फवारे उडवतो, असे येथील मच्छीमार रामकृष्ण पावसे यांनी सांगितले.

हर्णै बंदरात व्हेलसह डॉल्फिन वास्तव्याचे प्रमाणही जास्त आहे. त्यांना पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून हजेरी लावतात; परंतु सध्या समुद्रात एलइडी आणि फास्टर नौकांच्या बेसुमार अवैध मासेमारीमुळे ही जैवविविधता लवकरच नष्ट होऊ शकते. भविष्यात व्हेल मासा फोटोमध्ये दाखवण्याची वेळ येऊ नये याकरिता यावर ठोस कारवाईची उपाययोजनांची गरज ओंकार मच्छीमार सोसायटीचे चेअरमन हरेश कुलाबकरनी अधोरेखित केली.

कोळंबींच्या थव्याबरोबर वास्तव्य :
कोकण किनारपट्टीचे उत्तरेकडील सागरी परिक्षेत्र हे हम्पबॅक व्हेलसाठी महत्वाचे स्थान बनले आहे. बहुतांश वेळा हे सागरी सस्तन प्राणी तारली, मांदेली आणि कोळंबींच्या थव्याबरोबर दिसल्याची नोंद करण्यात आली आहे. दापोली तालुक्यातील लाडघर बीचवरदेखील २०१४ ला मृतावस्थेत व्हेल मासा वाहून आला होता.

५७ फूट लांबीचा अजस्त्र ब्लू व्हेल :
२०२० मध्ये सालदुरे मुरूड समुद्रकिनारी ५७ फूट लांबीचा अजस्त्र असा साधारण ५०० किलो वजनाचा ब्लु व्हेल मासा मृतावस्थेत सापडला होता. त्या वेळी मोठ्या गलबताला आपटून किंवा समुद्र प्रदुषणामुळे अथवा आपल्या कुटुंबापासून दूर राहिल्यामुळे अशा माशांचा मृत्यू ओढवतो अशी माहिती तत्कालीन अधिकाऱ्यांनी दिली होती. आता देखील येथील मच्छीमारांनी अशीच भीती वर्तवली आहे.