कोकणात सापडली 40 हजार वर्षांपूर्वीची दगडी हत्यारे .

Payal Bhegade
02 Dec 2023
Blog

कोकणात सापडली 40 हजार वर्षांपूर्वीची दगडी हत्यारे; शिकार, जनावरांचं मांस फाडण्यासाठी केला जात होता वापर
रत्नागिरी : कोकणात गेली दहा वर्षे कातळ खोदशिल्पांवर संशोधन सुरू आहे. पहिले कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्रही रत्नागिरीत सुरू झाले. केंद्राच्या माध्यमातून चालू असलेल्या संशोधनात्मक कामातून मालवण, राजापूर, रत्नागिरी या तालुक्यांमध्ये दगडी हत्यारे सापडली आहेत.

मध्य-पुराश्म ते मध्याश्मयुग म्हणजेच साधारणपणे इसवी सन पूर्व ४० ते १० हजार या कालखंडातील ही हत्यारे असावीत. हा मानवाच्या अस्तित्वाचा महत्त्वाचा पुरावा आहे. ही सर्व हत्यारे सर्वसामान्यांना पाहण्यासाठी कोकणातील कातळखोद चित्र आणि वारसा संशोधन केंद्रात उपलब्ध आहेत.

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या पुढाकाराने आयआयटीएम प्रवर्तक, आयआयटी (मद्रास) आणि निसर्गयात्री संस्था (रत्नागिरी) यांच्यातर्फे संचलित कोकणातील कातळशिल्प संशोधन हा राष्ट्रीय प्रकल्प सुरू आहे. अभ्यास, संशोधन करताना सापडलेली दगडी हत्यारे ही कोकणातील मानवी उत्क्रांतीच्या प्रवासात खूप मोठी आणि महत्त्वपूर्ण आहेत. तसेच दक्षिण कोकणात कातळशिल्प रचनांचा कालखंड निश्चित करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पुरावे आहेत.

रत्नागिरीमधील सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, प्रा. डॉ. सुरेंद्र ठाकूर-देसाई यांनी १० वर्षे अखंड मेहनतीतून कातळशिल्परुपी अनोखा वारसा जगासमोर आणला. यावर पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे व सहकार्याने, पुरातत्त्व अभ्यासक ऋत्विज आपटे आणि विविध ज्ञानशाखेतील तज्ज्ञ मंडळींच्या साथीने सखोल संशोधनात्मक काम चालू आहे. कातळशिल्प संशोधन चालू संशोधनातील एक मुख्य भाग म्हणजे कातळशिल्प परिसरात पुरातत्त्वीय सर्वेक्षण.

या चालू असलेल्या संशोधनात्मक कामामध्ये ऋत्विज आपटे, सुधीर रिसबूड व धनंजय मराठे यांसह कातळशिल्प संशोधन प्रकल्पावर कार्यरत तरुण संशोधक दिव्यांश कुमार सिन्हा, रघुनाथ बोकिल, मधुसुदन राव, स्नेहा धबडगाव, रेणुका जोशी, तार्किक खातू यांचा समावेश आहे. १८ ते २० लाख वर्षांपूर्वी मानवाने दगडांचा वापर हत्यारे म्हणून सुरू केला. अनुभवानुसार त्याने दगडांना आकार देऊन सहज बाळगता येतील अशी उपयुक्त हत्यारे बनवली. त्याच्या साहाय्याने शिकार करणे, मेलेल्या जनावरांचे मांस साफ करणे, फाडणे इत्यादी गोष्टी करू लागला. काळानुरूप दगडी हत्याऱ्यांमध्ये झालेल्या बदलानुसार त्यांचे आकार, पद्धती, निर्मितीचे तंत्र यानुसार त्यांचे कालखंड ठरवले जातात. कोकणातील दगडी हत्यारे येथे मानवी वस्ती अंदाजे किती वर्षांपासून अस्तित्वात होती याचा पुरावा आहे. कोकणच्या प्रागैतिहासिक कालखंडाबाबत पुरातत्त्वीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे पुरावे या रूपाने समोर आले आहेत.
संचालक, पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या पूर्वपरवानगीने हे पुरातत्त्वीय सर्वेक्षण चालू आहे. या सर्वेक्षणाच्या प्राथमिक टप्प्यावर मालवण, राजापूर, रत्नागिरी या तालुक्यातील काही कातळशिल्प ठिकाणांच्या परिसरात अश्मयुगीन दगडी हत्यारे आढळून आली आहेत. पुढील संशोधनात्मक कामासाठी यातील काही नमुने गोळा करून त्यावर शास्त्रीय चाचण्या करत आहेत.

- सुधीर रिसबूड

आढळलेली हत्यारे
गेले वर्षभर चालू असलेल्या कातळशिल्प संशोधनातील एक मुख्य भाग म्हणजे कातळशिल्प परिसरात पुरातत्त्वीय सर्वेक्षण. संशोधनात्मक कामातून मिळालेली दगडी हत्यारे ही काही मध्यम आकाराची तसेच काही सूक्ष्म आकाराची आहेत. यात प्रामुख्याने तासणी (Scrapers), सूक्ष्म पाती (Micro Blades), गाभे (Cores), प्रीपेड कोर (Prepared Cores), छिलके (Flakes) यांचा समावेश आहे. मिळालेल्या दगडी हत्याऱ्यांचा आकार, बनवण्याची पद्धती यांवरून ही दगडी हत्यारे मध्य-पुराश्म (Middle Paleolithic) ते मध्याश्मयुग (Mesolithic) या कालखंडातील हे पुढे आले आहे. त्याच्या आधारे कातळशिल्पांचा कालखंड निश्‍चित करण्यास संशोधकांना मदत होणार आहे.