जिल्ह्यातील ऊसतोड हंगामाच्या सुरुवातीपासूनच गती मिळाली असून आतापर्यंत १४ हजार टन उसाची तोडणी पूर्ण झाली आहे. गेली दोन वर्षे तोडणीमुळे मेटाकुटीस आलेल्या ऊस उत्पादकांसाठी हा शुभ संकेत मानला जात आहे. ही गती कायम राहिल्यास ऊसतोड वेळेत होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
जिल्ह्यातील वैभववाडी, कणकवली तालुक्यात ऊस लागवडीचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय अन्य तालुक्यांमध्येही काही प्रमाणात लागवड आहे. यावर्षी जिल्ह्यात १ हजार २०० हेक्टरवर ऊस लागवड केलेली आहे. गेली चार-पाच वर्षे ऊस तोडणीमुळे ऊस उत्पादक शेतकरी अक्षरक्षः मेटाकुटीला आले होते. त्यामुळेच १ हजार ७०० हेक्टरवरून ऊस लागवडीचे क्षेत्र १ हजार २०० हेक्टरवर आले आहे. दोन-तीन वर्षांचा शेतकऱ्यांचा अनुभव आणि यावर्षी करूळ घाटरस्ता काँक्रीटीकरणाचे सुरू होणारे काम यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादकांनी कारखान्याकडे जिल्ह्यातील ऊस तोडणी तातडीने सुरू करावी, अशी मागणी केली होती.
ऊस उत्पादकांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करीत डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखाना प्रशासनाने गळीत हंगामाच्या सुरूवातीपासुन सिंधुदुर्गातील तोडणीला गती दिली आहे.
यावर्षीचा गळीत हंगाम ५ नोव्हेंबरला सुरू झाला. सुरूवातीच्या दोन-तीन दिवसानंतर ऊसतोडणी कामगार जिल्ह्यात येण्यास सुरूवात झाली. २२ दिवसांत जिल्ह्यातील १४ हजार टन उसाची तोडणी पूर्ण झाली आहे. तोडणीची गती कायम राहिल्यास जिल्ह्यातील ऊस तोडणी वेळेत पूर्ण होईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
...तर लागवड क्षेत्रात वाढ
जिल्ह्यात यावर्षी गतीने ऊसतोड सुरू आहे. यावर्षीप्रमाणे दरवर्षी तोडणी झाली तर शेतकरी पुन्हा ऊस लागवडीकडे वळतील आणि ऊस लागवड क्षेत्रात देखील चांगली वाढ होऊ शकेल. मागील पाच-सहा वर्षांत ऊस लागवड क्षेत्रात तब्बल ५०० हेक्टरने घट झाली आहे. यावर्षी समाधानकारक तोडणी सुरू आहे. ही गती कमी करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
दोन-तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी कारखान्याकडून वैभववाडीतील ऊसतोड गतीने केली जात आहे. कारखाना प्रशासनाने त्यात बदल करू नये. यात सातत्य राहिल्यास फेब्रुवारीपूर्वीच तोडणी पूर्ण होईल.
- किशोर जैतापकर, ऊस उत्पादक शेतकरी, नापणे
यंदा हंगामाच्या सुरवातीपासूनच ऊसतोडणीला गती
