मार्च महिन्यात चार दिवस गोव्यात राहण्याचा योग आला. तसे गोव्याच्या पुढेही कारवारपर्यंन्तचा भाग म्हणजे कोकणच. फक्त राज्य वेगवेगळी आहेत.
गोव्याचे बहुतांशी अर्थकारण हे पाण्यावर अवलंबुन आहे. इथला समुद्र, नद्या, खाड्यांवरचे व्यवसायिक पर्यटन इथे पाण्यासारखा पैसा मिळवुन देते. गोवेकरांनी पोर्तुगाल माणसांची स्थापत्य कला जपुन ठेवली आहे हे आणखी एक गोव्याचे वैशिष्ट.
गोवा व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे तुलनात्मकदृष्टया पाहीले तर गोव्याचे पर्यटन हे पावसाळी जवळपास पुर्णपणे ठप्प असते तर ‘ रत्नसिंधु ’ जिल्हात बारमाही पर्यटनाला संधी आहे.
तुमच्या ‘रत्नसिंधु’ जिल्हयात आंबा, काजु आणि मासे याव्यतिरीक्त पर्यटनासाठी काय आहे असे बरेचसे मित्र मला विचारतात त्यांच्या माहितीसाठी मुद्दामहुन हा लेख लिहित आहे.
तर आमच्या ‘रत्नसिंधु’ म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हयाच्या पुर्वेला उंचच उंच डोंगररांगा आहेत व पश्चिमेला अथांग निळाशार असा स्वच्छ समुद्र व समुद्रकिनारे आहेत. आपल्याला कोकणात पर्यटन करायचे असेल तर ते दोन भागात करा.
पावसाळ्यात तुम्हाला हिरवेगार कोकण स्वर्गीय सुखाचा आनंद देईल. पावसाळ्याच्या सुरुवातीला इथल्या भातशेतीच्या कामांचा अनुभव तुमच्या जेवणाच्या ताटात येणा-या प्रत्येक भाताच्या शितामागच्या मेहनतीचे चित्र दाखवेल. इथल्या पारंपारीक लावणीसाठी आता मुंबई पुण्यातले पर्यटक पैसे देवुन तुम्हाला लावणीचा आनंद घेताना दिसतील. पुर्वेकडून पश्चिमेकडच्या समुद्राच्या ओढीने वाहणारे येथील धबधबे, ओढे, नद्या, खाडया यांच्या प्रवाहाचा आनंद आपण लुटू शकता. रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी येथील रानपाट, चिपळुणजवळील सवतसडा सिंधुदुर्गातील आंबोली, सावडाव, शिवडाव हे पर्यटकांना आकर्षित करणारे सुरक्षीत धबधबे आहेत. पावसाळयात कोकणातील धरणे पुर्ण भरल्यानंतर त्यांच्या सांडव्यातुन वाहणारे पांढरेशुभ्र पाणी आकर्षक दिसते.प्रामुख्याने लांजा तालुक्यातील खोरनिनको, संगमेश्वर येथील गडनदीवरील पाचांबे, राजापुर येथील करक अर्जुना नदीवरील धरणांच्या सांडव्यांना अवश्य भेट द्या. श्रावण महिन्यात इथल्या रानमाळांवर रानटी फुलांंचा महोत्सव असतो त्यासोबतच इथे वेगवेगळ्या रानभाज्याही मिळतात ज्यांची सहजपणे तुम्ही चव चाखु शकता.
कोकणात गोव्यापेक्षाही अप्रतिम व नितांतसुंदर समुद्रकिनारे आहेत. तळकोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग या सख्या भावंडांचा विचार केला तर वेळास, केळशी, आंजर्ले, मुरुड, कोळथरे, गुहागर, बुधल, मालगुंड,गणेशगुळे, भांडारपुळे, रिळ, व्येत्ये, देवगड, कुणकेश्वर, मुणगे, देवबाग,निवती,तारकर्ली असे एकाहुन एक भन्नाट हे समुद्रकिनारे आहेत. पांढरीशुभ्र वाळुची पुळण, समुद्राच्या लाटांची लयबद्ध गाज, स्वच्छ सुंदर पाणी असे प्रत्येक किना-याचे काही वेगळेपण आहे. गोव्यात किना-यावर गजबज आहे तर कोकणातल्या किना-यावर शांतता आहे. समुद्र किना-यांची दोन्ही जिल्ह्यातील संख्या शंभरहुुन अधिक आहे.
यातील वेळास, केळशी, गुहागर हे समुद्रकिनारे कासवांच्या विणीसाठी प्रसिद्ध आहेत. या किना-यावर कासव अंडी घालतात व त्या अंड्यातुन समुद्राकडे दुडुदुडुु झेपावणारी त्यांची पिल्ले पाहण्यासाठी हजारो पर्यटक दरवर्षी येतात वेळोवेळी या कासव महोत्सवाच्या प्रशासनामार्फत तारखा जाहिर केल्या जातात.
कोकणात थंड हवेची ठिकाणे आहेत. दापोली ला मिनी महाबळेश्वर म्हणुन संबोधले जाते तर लांजा तालुक्यातील माचाळ व बापेरे येथील गंगुची बाऊल , संगमेश्वरातील टिकलेश्वर हि थंड हवेचे ठिकाण म्हणुन प्रसिद्धीस येत आहेत.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळुन पन्नासहुन अधिक किल्ले आहेत. यात जलदुर्ग, भुईकोट, वनदुर्ग, गिरीदुर्ग अशा प्रकारचे किल्ले आजही अस्तित्वात आहेत.
कोकणातील सड्यांवर आदिमानवाने शेकडो वर्षापुर्वी पुष्कळ प्रमाणावर कातळशिल्पेे कोरली आहेेेत. शेकडो वर्षापुर्वीची हि कातळशिल्पे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर, लांजा, रत्नागिरी येथे मोठ्या प्रमाणावर आढळतात. यातील फक्त रत्नागिरी जिल्हयात यांची संख्या तीनशेहुन अधिक आहे. या कातळशिल्पांसोबतच कोकणातील डोंगररांगात विविध ठिकाणी असलेल्या बुद्धकालिन लेण्यांचे ही संवर्धन आता होत आहे. कोकणातील या कातळशिल्पांच्या लाल कातळांवर श्रावण महिन्यात सोनयाळी, कात्री,मंजिरी,फुलपत्री अशा विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांंचा महोत्सव असतो सोबत याच कातळांवर वेगवेगळ्या रानभाज्याही मिळतात ज्यांची सहजपणे तुम्ही चव चाखु शकता.
कोकणात शिवकालीन मंदिरे मोठ्या प्रमाणात आहेत. देशभरातील बहुसंख्य कुटुंबांचेे कुलदैवतही कोकणात आहेत. पारंपारिक जुन्या स्थापत्यकलेचे उत्तम नमुना असलेली मंदिरेही कोकणात आहेत. भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराात नावे लिहिली गेलेली रत्ने आमच्या रत्नसिंधू आहेत.
कोकणात जैवविविधता मोठया प्रमाणात आढळते. विविध प्रकारचे प्राणी यात हरिण, वाघ, चित्ता, गवा यांसोबतच दुर्मिळ ब्लॅक पँन्थर, खवले मांजर आहे. केशरी खंड्या, स्वर्गीय नर्तक, धनेश अशा दुर्मिळ प्रजातींसह दिडशेहुन अधिक विविध प्रकारचे पक्षी रत्नसिंधू मध्ये आढळतात. यासोबतच सीगल्स, युरेशीयन करलॉक, टन्स असे परदेशी पाहुणेही कोकण भेटीला आल्याचे दिसते. दिवसा व रात्री जंगल सफारी आपण करु शकतो.
सर्वात महत्वाचे म्हणजे इथली पारंपारीक खाद्यसंस्कृती. जगाच्या पाठीवरुन कोकणात येणा-या पर्यटकांच्या जीभेवर चव रेंगाळुन राहते. येथील दशावतार, नमन, जलसा अशी पारंपारीक लोककलाही आपल्या रात्रीची करमणुकीची सोय करतात
रत्नसिंधू मध्ये पर्यटनस्थळे आहेत परंतु खंत वाटते की, गोव्यासारखे पौर्यटनाला चालना देणारे प्रशिक्षित मनुष्यबळाचा इथे अभाव आहे. यामुळेच इथे पर्यटन क्षेत्राबाबत अनास्था आहे. पर्यटकांची संख्या वाढली तर रोजगार वाढेल पर्यायाने लोकांना रोजगाराचे साधन उपलब्द् होईल.
अजुन बरच काही आहे आमच्या कोकणात ....एकदा येवुन डोळे भरुन पहा आणि ह्दय भरुन सोबत घेवुन जा.
येताय ना..............................!
!! येवा कोकण आपलाच आसा !!
येवा कोकण आपलाच आसा
