साठवली किल्ला

Payal Bhegade
20 Apr 2024
Fort

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक भुईकोट किल्ला. त्याचा साटवली किंवा सातवळी असाही उल्लेख केला जातो. लांज्यापासून २० कि.मी. अंतरावर साठवली गावाजवळ मुचकुंदी नदीच्या उत्तर तीरावर हा किल्ला वसलेला आहे. आकाराने लहान असलेला हा किल्ला म्हणजे एखादे गढी सदृश्य बांधकाम भासते.

साठवलीतील मंदिराच्या थांब्याजवळ उतरून कच्च्या रस्त्याने गावातील विठ्ठल-रखुमाई मंदिराजवळ पोहोचता येते. गडावर असलेली एक छोटी तोफ सध्या या मंदिराबाहेरील जागेत आहे. मंदिराचे व परिसराचे बांधकाम चिऱ्यांमध्ये केलेले आहे. मंदिराशेजारी एका दगडात कोरून काढलेले छोटे एकपाषाणी मंदिर आहे. या मंदिरात खडकात खोदलेली विष्णुची साधारणतः चार फूट उंच एक जीर्ण मूर्ती आहे. ही मूर्ती साधारणतः चौथ्या शतकातील असावी. मंदिरामागे एक छोटी १.५ मी. लांबीची तोफ छोट्या कट्ट्यावर ठेवलेली आहे.

गावातील मुख्य रस्त्याने पश्चिमेकडे २०० मी. अंतरावर साठवली किल्ल्याचे बुरूज व तट दिसतात. गाडीरस्ता खूप वळसा घालून येथे पोहोचतो. किल्ल्याचा दरवाजा दोन बुरुजांमध्ये वक्राकृती पद्धतीने बांधलेला दिसतो. मराठाकालीन किल्ल्यांवरील दरवाजांची बांधणी अशाच पद्धतीची असते. बुरूज बऱ्या स्थितीत असून दरवाजाची कमान पडलेली आहे. कमान पेलणारे खांब दरवाजाच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. बुरुजांची उंची १० फूट ते १५ फूट आहे. किल्ल्याभोवती मोठ्या प्रमाणवर झाडे वाढल्याने बुरुजांची उंची निश्चित किती होती, ते कळू शकत नाही. किल्ल्याचा एकूण तटबंदीयुक्त परिसर हा साधारणत: एक एकर एवढा आहे. भग्न दरवाजातून आत गेल्यावर एक विशाल वृक्ष वाढलेला दिसतो. या वृक्षाजवळच एक आयताकृती विहीर आहे. किल्ल्यातील या विहिरीतदेखील एक झाड वाढलेले आहे. विहिरीशेजारीच एक गोलाकार घडीव दगड पडलेला आहे. किल्ल्याच्या पश्चिमेकडील तटाजवळ पोहोचता येते. उत्तरेला दोन बुरूज, दक्षिणेला एक व पूर्वेला तीन बुरूज आहेत. किल्ल्याच्या तटबंदी व बुरुजावर झाडे वाढलेली आहेत. किल्ल्यात विहिरीजवळच एक चौथरा दृष्टीस पडतो. किल्ल्यातील वाड्याच्या बांधकामाचा तो चौथरा असावा. किल्ल्यात या व्यतिरिक्त कोणतेही अवशेष नाहीत. किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेरील बाजूने खंदक असल्याच्या खुणा दिसतात. किल्ल्याच्या तटबंदी व बुरुजांमध्ये तोफा व बंदुकांचा मारा करण्यासाठी जंग्या बांधलेल्या आहेत. तटबंदीवर फांजी देखील काही ठिकाणी अस्तित्वात आहे.

मुचकुंदी नदीच्या खाडीतील दुय्यम व्यापारी बंदर अशी साठवलीची ओळख आहे. व्यापारी पूर्णगड जवळील मुचकुंदी नदीच्या खाडीतून छोट्या बोटीने साठवलीपर्यंत येत असत. साठवलीपासून पुढे जमिनीच्या मार्गाने प्रभानवल्लीमार्गे विशाळगड जवळून कोल्हापूरकडे जाता येते. साठवली या बंदरातून शिवपूर्व काळापासून ते ब्रिटिशांच्या काळापर्यंत व्यापार चालू होता. सातवळी किंवा साठवली या बंदराचा प्रथम उल्लेख इ. स. १६५९-६० साली येतो. छ. शिवाजी महाराजांच्या सैन्याने कोकणात उतरून आदिलशाही सरदार रुस्तुम-इ-जमान याचा पराभव केला. त्यावेळी दाभोळ येथे अफजलखानाचा मुलगा फाजलखान याच्या वतीने महमूद शरीफ हा बंदर अधिकारी होता. तो राजापूरला पोहोचला आणि पाठोपाठ सातवळीचा बंदर अधिकारी देखील तेथे पोहोचला असा उल्लेख इंग्लिश रेकॉर्डस ऑन शिवाजी या ग्रंथात आहे. ईस्ट इंडिया कंपनीचा राजापूर येथे विठ्ठल गोमटी नावाचा दलाल होता. त्याने विजापूर येथून सुरतेला पाठविलेल्या एका पत्रात सातवळी बंदराचा उल्लेख येतो (५ फेब्रुवारी १६४०). त्यामध्ये तो अशी माहिती देतो की, ‘जर राजापूर बंदर आवडले नाही, तर खारेपाटण आणि सातवळी ही देखील दोन अतिशय चांगली बंदरे आहेत. सातवळी हे नवीन बंदर असून ते राजापूर पासून सहा कोसावर आहे. तेथे पहिली तीन वर्षे जकात माफ केली जाते. ते मुस्तफाखानच्या मुलाच्या अंमलाखाली आहे.ʼ यावरून असे लक्षात येते की, साठवली आदिलशाही साम्राज्यातील एक बंदर होते. येथून होणाऱ्या व्यापारावर देखरेख करण्यासाठी आणि या व्यापाराला संरक्षण देण्याच्या दृष्टीने साठवली येथे किल्ला बांधला असावा. १७१३ मध्ये छ. शाहू महाराज व कान्होजी आंग्रे यांच्यातील तहामध्ये जे १६ किल्ले कान्होजींना मिळाले, त्यात साठवलीचा किल्ला होता. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांकडे होता. अंदाजे १५० वर्षांपूर्वी एका गुजराती व्यापाऱ्याने साठवली गावात विठ्ठलाचे मंदिर बांधून दिले.