परमेश्वराने कोकणाला दिलेले वरदान हापूस आंबा ! कोकणातील हापूस आंबा वस्तुस्थिती !
निसर्गाने आणि परमेश्वराने कोकणाला भरभरून दिली आहे, पण आपला असंघटित पणा, उदासीनता, सर्व स्तरावरची अनास्था यातून इतर सर्व विषयाप्रमाणे या विषयाची सुद्धा आपण माती करत आहोत.
जगातील सर्व फळांचा राजा कोकणातला विशेषता देवगड आणि रत्नागिरीचा हापूस, या शेतीची आजची वस्तुस्थिती काय ?
सुरुवातीला दहा हजार रुपये पेटीचा भाव आपण बातम्या वाचतो.
त्यामुळे असा समज होतो की कोकणातला आंबा बागायतदार तर खूप श्रीमंत आहे. कारण हापूस आंब्याला भरपूर भाव मिळतो.
हो दहा-पंधरा वर्षांपूर्वी अशी स्थिती होती की कोकणातला हापूस आंबा बागायतदार हा खूप श्रीमंत नाही पण सुखी होता. गेल्या दहा पंधरा वर्षात तीन चक्रीवादळे, निसर्गाची अनियमितता ग्लोबल वॉर्मिंग आणि समजून न घेता तंत्रज्ञानाचा अतिरेकी उपयोग यातून आता कोकणातला अंबा बागायतदार
शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे.
शेतीसाठीच कर्ज घेतले ,पुढच्या वर्षी चांगला आंबा येईल, पुढच्या वर्षी चांगला आंबा येईल असा विचार करून शेतकरी अधिक कर्ज घेत गेले , येणारे उत्पन्नातून खर्च वजा करतात फार काही उरत नाही त्यामुळे कर्ज फेडता येत नाही कर्ज वाढत गेले, आणि हे कर्ज फेडता येणार नाही अशी अनेक शेतकऱ्यांची स्थिती झाली. कोकणातला शेतकरी कधीच आत्महत्या करत नाही, पण हापूस आंबा
बागायतदार शेतकऱ्यांची स्थिती चिंताजनक आहे आणि वेळेत यावरती उपाय योजना करणे आवश्यक आहे.
असे का झाले ?
जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात हापूस आंब्याचे पेटीला दहा हजार /पाच हजार/ चार हजार रुपये भाव मिळतो. पण इतक्या लवकर ठराविक भागात आंबा येतो आणि तो एकूण उत्पन्नाच्या पाच ते दहा टक्के येतो
मात्र खरा आंबा हा गुढीपाडव्यापासून सुरू होतो आणि खूप मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याचे उत्पादन मे महिन्यामध्ये येते. यावेळी कर्नाटक आणि दक्षिणेतून हापूस आंब्यासारखा दिसणारा जाड सालीचा आतून पिवळ्या रंगाचा व चव नसलेला आंबा मोठ्या प्रमाणात येतो.
हा आंबा हूबेहूब हापूस सारखा दिसतो. तो हापुसच्या निम्म्या किमतीमध्ये मिळतो , या आंब्याची कोकणातील हापूस मध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. एप्रिल 15 नंतर यामुळे हापूस आंब्याचे भाव खूप मोठ्या प्रमाणात पडतात. शेवटी शेवटी पेटीचा भाव आठशे रुपये ,हजार रुपये /बाराशे रुपये या लेवलला येतो. आणि मग खर्च वगळता शेतकऱ्याच्या हातात काहीच राहत नाही. वर्षभर प्रचंड परिश्रम करून सुद्धा कोकणात हापूस आंब्याची व्यापारी शेती करणारा शेतकरी हा यामुळे कर्जबाजारी होत आहे.
कोकणातील हापूस आंबा हा राजा आहे, तो राजा इतकाच लहरी आहे, या आंब्याची खूप काळजी घ्यावी लागते, राजा असल्यामुळे इतर आंब्यापेक्षा याचे उत्पन्न खूप कमी येते. ते एक वर्ष आड येते. हे उत्पन्न यावे यासाठी आंबा बागेची भरपूर मशागत करावी लागते. कातळावरच्या अंबा बागायती यामध्ये कष्ट करीत असलेला आंबा बागायतदार
हा प्रचंड परिश्रम करतो त्यावेळी आपल्याला स्वर्गीय चव असलेला हापूस आंबा मिळतो. हा हापूस आंबा सावलीत काढावा लागतो, सावलीत ठेवावा लागतो ,याला ऊन चालत नाही. अतिशय काळजीपूर्वक लाकडाच्या पेट्यांमध्ये भरावा लागतो. याची पॅकेजिंग कॉस्ट खूप आहे, याकरता भरपूर कामगार लागतात या संपूर्ण प्रोसेस ला खूप परिश्रम आहेत आणि खूप खर्च आहे त्यामुळे हापूस आंब्याची स्वतःची बाग असेल तरीही हापूस आंब्याचा उत्पादन खर्च आठशे ते हजार रुपये पेटी येतो. आणि मग जेव्हा मुख्य उत्पन्न येतं त्यावेळी बाजार भाव सुद्धा 800 ते 1000 रुपये पेटी इतका दिला जातो. ज्यामुळे परिश्रम करून सुद्धा शेतकऱ्यांना काहीच उत्पन्न मिळत नाही.
मला अनेक शेतकरी माहित आहेत की जे वर्षाला तीन हजार /चार हजार पेट्या हापूस आंब्याचा व्यवसाय करतात आणि साधी मोटर सायकल विकत घेऊ शकत नाहीत. आणि हे परिश्रमी बागायतदार दुर्दैवाने कर्जाच्या फेऱ्यांमध्ये अडकलेले आहेत, ही आजची श्रीमंत हापूस आंब्याच्या शेतीची अवस्था आहे.
ज्यांनी आधुनिक शेतीचा अवलंब केला लवकर आंबे यावेत म्हणून कलटार वापरला वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक खत वापरली , कीटक नियंत्रणासाठी महागडी कीटकनाशके वापरले अशा शेतकऱ्यांचा खर्च अजून वाढला, त्या तुलनेत उत्पन्न येत नाही आणि बाजार भाव मिळत नाही. हे शेतकरी अजूनच अडचणीत येत आहेत.
मात्र जे अतिरेकी तंत्रज्ञान वापरत नाहीत, सेंद्रिय शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा सुवर्णमध्य साधतात, अनेक शेतकऱ्यांची पुढची पिढी स्वतः मुंबई पुण्यात जाऊन आंबे विकतात, आपल्या आंब्याचा ग्राहक त्यांनी स्वतः तयार केला आहे केवळ असे निवडक आंबा बागातदार शेतकरी आज या व्यवसायामध्ये सुखी आहेत असं म्हणता येईल.
एमआयडीसी मोठे कारखाने मोठे प्रकल्प हे सगळे झुट आहे वस्तुस्थिती आहे की कोकणातील तरुण, कोकणातील कुटुंब खूप मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची शेती काजू आणि मासेमारी यावर अवलंबून आहेत आणि यातूनच कोकणात खऱ्या अर्थाने रोजगार मिळतो. ज्या पद्धतीने ऊस, साखर कारखाने, कापसाची शेती ,द्राक्ष, डाळिंब महाराष्ट्रातील अन्य भागातील शेतकऱ्यांची काळजी घेतली जाते अशी दुर्दैवाने कोकणातल्या शेतीची आणि शेतकऱ्यांची काळजी घेतली जात नाही ही वस्तुस्थिती आहे पण याबद्दल स्वतंत्र लेख लिहिन.
जगातील सर्वात श्रीमंत कृषी उत्पादना मधून कोकणातील शेतकरी समृद्ध होणार नाही का ? या अडचणींवर मात करता येणार नाही का. ?
हो हे शक्य आहे पण त्यासाठी सर्वात महत्त्वाचे कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी एकत्र यायला हवं. आपल्या प्रश्नांची उत्तरं आपणच शोधायला हवीत आणि शासनाला आंबा शेती आणि शेतकऱ्यांना मदत करायला भाग पाडायला हव.
कोकणातील मुख्य उद्योग हापूस आंब्याची शेती विकसित होण्यासाठी नेमके काय केले पाहिजे.
वेंगुर्ला पासून अलिबाग पर्यंत. सर्व आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी सर्वप्रथम एकत्र आले पाहिजे.
व्यापारी, दलाल, बाजारपेठ या आवश्यक गोष्टी आहेत, त्यामुळे त्या बंद करता येणार नाहीत. मात्र फक्त दलालांवर आणि व्यापाऱ्यांवर हापूस आंब्याची शेती अवलंबून राहिले तर शेतकरी कधीच समृद्ध होऊ शकणार नाही.
यासाठी समांतर मार्केट व्यवस्था शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उभारले पाहिजे. जळगावचे केळी व्यापारी किंवा पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्ष बागातदार डाळिंब बागातदार स्वतः व्यक्तिगत आणि एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात आपल्या कृषी उत्पादनांचा मार्केटिंग देशभर आणि जगभर करतात. यासाठी सहकारी चळवळ खूप मोठ्या प्रमाणात राबवली जाते ती हापूस आंब्याच्या बाबतीत कोकणात राबवले जाणे आवश्यक आहे.
सर्व हापूस आंबा फक्त मुंबईच्या बाजारपेठेत येतो आणि त्यामुळे एकाधिकारशाही निर्माण होते. त्यामुळे योग्य भाव मिळत नाही ज्यावेळी खरा क्वालिटी अतिशय मधुर हापूस आंबा असतो त्यावेळी दुर्दैवाने हापूस आंब्याच्या भावाचा कचरा झालेला असतो.
कोकणातील हापूस आंबा थेट कोकणातून मुंबई पुणे बेंगलोर कलकत्ता दिल्ली अहमदाबाद येथील बाजारपेठेमध्ये जायला पाहिजे आणि हे एकटा शेतकरी करू शकत नाही यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन अशा स्वरूपाचे उपक्रम राबवले पाहिजेत.
संपूर्ण देशभर हापूस आंबा पाठवला
तर हापूस आंब्याला संपूर्ण देशात प्रचंड मागणी आहे, हापुस आंबा कुठल्या शहरात किती जाणार याचे नियंत्रण रत्नागिरी आणि देवगड मधून झाले तर हापूस आंब्याचे भाव शेवटपर्यंत स्थिर राहतील आणि शेतकऱ्यांना शेवटपर्यंत चांगला भाव मिळेल.
यासाठी एक सामुदायिक बाजार व्यवस्था शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उभा रायला हवी. कोकण रेल्वेचा प्रभावी उपयोग करून देशभर हापूस आंबा कसा वितरित होईल यावर काम करायला हवे.
वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांचे हापूस आंब्याचे महोत्सव आयोजित करणे, हापूस आंब्याचा ब्रँड विकसित करणे, शेतकऱ्यांच्या बागेतून हापूस आंबा थेट ग्राहकांच्या घरापर्यंत किंवा वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये पोहोचवणे असे अनेक उपक्रम आम्ही आमच्या चळवळीतून राबवले आहेत.
ग्लोबल कोकण आणि कोकण आंबा बागायतदार संघाच्या माध्यमातून यावर्षी होलसेल मध्ये चांगल्या दर्जाचा रत्नागिरी देवगड हापूस आंबा हा मुंबई पुण्यात वेगवेगळ्या विभागात वितरित करण्याचे नियोजन करत आहोत. कोकणातील तरुणांनी उद्योजकांनी आपापल्या भागामध्ये हापूस आंब्याची विक्री करावी त्यांना होलसेल दराने शेतकऱ्यांकडून थेट अंबा मिळेल अशी एक व्यवस्था उभी करत आहोत. मुंबई पुण्यात पाचशे तरुण उद्योजकांनी दोन महिने हापूस आंबा विक्रीचा उद्योग केला, योग्य भावात ग्राहकांना ओरिजनल हापूस आंबा उपलब्ध करून दिला तर शेवटपर्यंत चांगला भाव मिळेल आणि शेतकऱ्यांना याचा चांगला मोबदला मिळू शकेल. कर्नाटक आणि दक्षिण भारतातले आंबे कोकणातील हापूस आंबा म्हणून खाण्यापेक्षा चांगले आंबे जर लोकांना आपापल्या भागात उपलब्ध झाले तर ग्राहक शेवटपर्यंत नीट किंमत देतील, आणि शेतकऱ्यांना नीट मोबदला मिळू शकेल.
हापूस आंबा आणि कोकण