सागवानाची उपलब्धता असूनही वालावल गावातील लोकांच्या घरात सागवान लाकडाचा वापर केला जात नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे येथील तीर्थक्षेत्र श्री लक्ष्मीनारायण मंदिरासाठी साग हा छप्पर व इतर कामासाठी वापरला जातो. लक्ष्मीनारायण मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिराचे काम सागवानी लाकूड वापरून केल्याने केवळ श्रद्धेपोटी येथील लोक घरासाठी सागवानाचा वापर करत नाहीत.
कोकणात माणूस आणि आंबा खात नाही, असे म्हटल्यावर आपल्या आर्श्चयाचा धक्का बसतो. तशीच गोष्ट आहे सागवानाबाबत. कोकणात अनेक ठिकाणी सागवानाची लागवड होते; आणि घराच्या बांधकामात सर्रास त्याचा वापर होतो; पण कुडाळ तालुक्यातील असे एक गाव आहे, जेथे सागवान मोठ्या प्रमाणात आहे; पण घराच्या बांधकामात त्याचा वापर केला जात नाही. ते गाव म्हणजे वालावल. या वैशिष्ट्यामागे मात्र श्रद्धा जोडलेली आहे.
निसर्गाच्या सान्निध्यात कर्ली नदीच्या तीरावर कुडाळ तालुक्यातील वालावल गाव वसलेले आहे. प्रति पंढरपूर ओळखले जाणारे येथील ग्रामदैवत श्रीदेव लक्ष्मीनारायण मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील विलोभनीय तलाव ऐतिहासिक कुपीचा डोंगर गावाचे वैशिष्ट्य आहे. आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील लोक घरासाठी सागवानी लाकडाचा वापर करत नाहीत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे येथील तीर्थक्षेत्र श्री लक्ष्मीनारायण मंदिरासाठी सागवानी लाकडाचा वापर केला आहे. मंदिराचे छप्पर व इतर सर्व कामांसाठी सागवानी लाकूडचा वापर केले आहे. त्यावर सुंदर असे कोरीव कामही केलेले आहे.
मंदिरासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून सागवानी लाकडाचा वापर होत असल्यामुळे केवळ श्रद्धेपोटी येथील लोक घरासाठी सागवानाचा वापर करत नाहीत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सागवानची लागवड केली जाते. त्याचप्रमाणे विक्री सुद्धा होते; मात्र कोणताही या गावातील माणूस घरासाठी किंवा अन्य कोणत्याही कामासाठी सागवानाचा वापर करत नाही. ही कित्येक वर्षाची जोपासना आजही लोकांनी टिकवून ठेवली आहे हे विशेष आहे. पर्यटनदृष्ट्या जागतिक स्तरावर या गावाचा उल्लेख आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी नामवंत अभिनेत्री रंजना यांच्या गाजलेल्या "चानी' चित्रपटाचे चित्रीकरण झाले. हिंदी व मराठी जुन्या-नवीन चित्रपटांसह मालिकांचे चित्रीकरण येथे झालेले आहे. होत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून चित्रीकरणाची ही परंपरा आजही टिकून आहे.
कुडाळ शहरापासून अवघ्या दहा ते बारा किलोमीटरवर वालावल आहे. प्रतिपंढरपूर म्हणून या तीर्थक्षेत्राला लक्ष्मी नारायणाची ओळख आहे. या भागातील लोक प्रतिपंढरपूर वालावल या ठिकाणी असल्यामुळे पंढरपूरला जात नाहीत. दर्शनाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तर पंढरपूरला गेला तर तेथे दर्शनाचा योग काही जुळून येत नाही, अशी आणखी एक श्रद्धा गावात आहे. त्यामुळे येथील लोक दर्शनाचा उद्देश न ठेवता माणसे पंढरपूरला जाऊ शकतात.
इथे सापही मारला जात नाही
या गावाची आणखी एक खासियत आहे. या गावामध्ये साप मारला जात नाही. श्री लक्ष्मीनारायण विष्णूचा अवतार असल्यामुळे या ठिकाणी सापाला मारले जात नाही. कित्येक वर्षांची परंपरा आजही गावाने टिकवून ठेवली आहे.
शासनाच्या उपक्रमात सहभाग :-
गावाची लोकसंख्या दोन हजार आहे. पर्यटनमध्ये नावलौकिक मिळविलेल्या गावाने शासनाच्या विविध उपक्रमात सहभाग घेऊन जिल्हा कोकण राज्यपातळीवर विविध पुरस्कार मिळवले आहेत. येथील सर्व लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. क्रीडा आरोग्य शिक्षण या क्षेत्रातही गावाने आपला ठसा उमटविला आहे.
संपादन - अर्चना बनगे
सिंधुदुर्ग मधील कुडाळ तालुक्यातील वालावल गावाची आख्यायिका
